Tuesday, May 11, 2010

ARTIFICIAL RAIN





दोनशे लिटर क्षमतेची रिकामी टाकी, तिच्या एका तोंडाला लावण्याची लोखंडी जाळी, तिच्या आत हवा जाण्यासाठी तयार केलेली नळी, तापमान-वारा-आर्द्रता मोजणारे मापक... कोठेही सहज उपलब्ध होणाऱ्या या साधनांद्वारे पुण्यातील एका अभियंत्याने कृत्रिम पाऊस पाडणारे यंत्र तयार केले आहे. या यंत्रात भुश्‍श्‍याच्या विटा किंवा गोवऱ्या किंवा लाकडे घालून पेटविले आणि नंतर त्यात मीठ टाकल्यास प्रयोगानंतरच्या २४ तासांत पाच मिलिमीटरपर्यंत पाऊस होतो, असा दावा त्यांनी केला आहे.

डॉ. राजा मराठे हे या अभियंत्याचे नाव. मुंबईमधील "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी'चे ते पदवीधर आहेत आणि अमेरिकेच्या राईस विद्यापीठातून पीएच. डी. मिळविली आहे. भारताने बनविलेल्या "परम' या पहिल्या महासंगणकाच्या विकासकार्यात त्यांचा सहभाग होता. सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेल्या डॉ. मराठे यांनी गेल्या वर्षी नांदेड जिल्ह्यातील सुजलेगाव येथे कृत्रिम पावसाबाबतचे काही प्रयोग केले. अशा दहा प्रयोगांत नऊ वेळा पाऊस झाल्याचे ते सांगतात. सुजलेगाव परिसरातील अन्य गावांतही त्यांनी हा प्रयोग केला आहे.


असा करतात वरुणयंत्राचा कमी खर्चिक प्रयोग
पुणे - ""पावसाने दडी मारल्यास शेतीचे मोठे नुकसान होते. अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसतो. हे टाळण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यावर भर दिला पाहिजे,'' असे मत ज्येष्ठ अभियंते आणि कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या "वरुण यंत्रा'ची निर्मिती करणाऱ्या डॉ. राजा मराठे यांनी व्यक्त केले आहे.

कृत्रिम पावसाचे अनेक प्रयोग जगभर होत असतात. त्यांपैकी सर्रास केला जाणारा प्रयोग म्हणजे विमानाद्वारे ढगात सिल्व्हर आयोडाईडची फवारणी करणे. या खेरीज खास बनविलेल्या रॉकेटद्वारा किंवा तोफांद्वाराही सिल्व्हर आयोडाईडची फवारणी केली जाते. बहुतेक ठिकाणी हे प्रयोग सरकारकडून केले जातात, शिवाय त्यांचा खर्चही अधिक असतो. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी बारामतीमध्ये हा प्रयोग झाला आहे.

डॉ. मराठे यांनी "वरुण यंत्रा'चा छोटेखानी प्रयोग सुरू केला आहे. ते म्हणाले, ""कृत्रिम पावसाच्या कोणत्याही प्रयोगात ढगापर्यंत उत्प्रेरक नेले जाते. पाऊस पडण्यासाठी ढगा मधील पाण्याचे छोटे छोटे थेंब एकमेकांकडे आकर्षित होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी उत्प्रेरकाची गरज असते. मिठाचे सूक्ष्म कण हे उत्प्रेरकासारखे काम करतात. ढगामध्ये विमानाने मिठाची फवारणी शक्‍य नसल्यास जमिनीवर भट्टी करून त्यात मिठाचे कण टाकल्यास ते ढगापर्यंत पोहोचू शकतात. हे तत्त्व वापरून मी प्रयोग केले आहेत. हा प्रयोग कोणालाही सहजगत्या करता येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गावात तो होऊ शकेल. तसे झाल्यास पाऊस न पडण्याच्या अडचणीवर मात करता येईल.''

हा प्रयोग करण्यासाठी वातावरण ढगाळ असणे आवश्‍यक आहे. शिवाय प्रयोगाच्या वेळी हवेत चांगला ओलावा (आर्द्रता) असायला हवा आणि वारे नसावेत. पहाटेची किंवा सायंकाळची वेळ प्रयोगासाठी चांगली असल्याचे डॉ. मराठे यांनी सांगितले. या प्रयोगासाठी "आयआयटी'मधील आजी-माजी सहकाऱ्यांनी; तसेच रोहिणी नीलेकणी यांनी मदत केल्याचे त्यांनी सांगितले.

वरुण यंत्राचा प्रयोग कसा करावा?
"वरुण यंत्रा'चे नमुने डॉ. राजा मराठे यांनी तयार केले आहेत. त्याची किंमत २२५० रुपये आहे. सुजलेगाव (ता. नायगाव, जि. नांदेड) येथून ती मिळतील.

हे यंत्र म्हणजे दोनशे लीटर क्षमतेची लोखंडी टाकी आहे. तिच्या दोन्ही बाजूंकडील पत्रे नसतात. त्यामुळे पोकळ असलेल्या या टाकीच्या एका बाजूला लोखंडी गजांची जाळी बसवतात. याच जाळीवर एक सच्छिद्र आडवी नळी बसविली असते. तिच्या मध्यभागी काटकोनातून दुसरी नळी बसवून ती बाहेर काढतात. या नळीला "ब्लोअर' किंवा भाता जोडला जातो. विजेवर चालणारे "ब्लोअर' चालू केल्यास टाकीमध्ये ऑक्‍सिजनचा पुरवठा वाढतो. वीज नसल्यास भाता वापरला तरी चालतो.

यंत्र वापरण्याची कृती
या टाकीत जळण म्हणून लाकडे, गोवऱ्या, भुश्‍श्‍याच्या विटा सहा इंचापर्यंत रचून ठेवाव्यात. त्यानंतर त्यात रॉकेल टाकून पेटवावे. चांगला जाळ पेटल्यानंतर भुश्‍श्‍याच्या गोवऱ्या किंवा लाकडाच्या ढिपल्या दोन फुटांपर्यंत टाकीत टाकाव्यात. त्यानंतर "ब्लोअर'ने किंवा भात्याने जोरात हवा द्यावी. भट्टी चांगली पेटवून वर आगीचा जाळ यायला लागल्या की त्यात सुमारे सहा किलो मीठ (बारीक) थोडे-थोडे टाकत राहावे.

हा प्रयोग करण्यासाठी आकाश ढगाळ असणे, आर्द्रता अधिक असणे आणि वारा नसणे आवश्‍यक आहे. आर्द्रता मापक यंत्र कोणत्याही शाळेत वा कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असते.

वरुण यंत्राचे तंत्रज्ञान खुले असल्याचे डॉ. मराठे यांनी सांगितले. या यंत्राची नक्कल करण्यास सर्वांना परवानगी असल्याचे त्यांनी सांगितले.

पाऊस पाडा..
पावसासाठी निसर्गाच्या भरवशावरच बसण्यापेक्षा कृत्रिम पावसाचे प्रयोग सर्वांनी करावेत, असे आवाहन डॉ. राजा मराठे यांनी केले आहे. "पाऊस पाडा, पाणी अडवा, पाणी जिरवा' हे धोरण अवलंबले तरच पाण्याबाबत आपण स्वयंपूर्ण होऊ, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वय ंपूर्णता केंद्र' स्थापन केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क ः डॉ. राजा मराठे ९९७०४३५७४०, उमाकांत देशपांडे नावंदीकर ९९२२७२४१०३, संतोष देशमुख सुजलेगावकर ९९७०४६३९०२.

लहरी हवामानावर चीनने अशी केली मात
पुणे - चीनच्या शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या साह्याने आसमानी संकटावर मात केली आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ चीनचा वायव्य प्रांत कायम दुष्काळाच्या छायेत असे, तर देशाच्या दुसऱ्या भागात पुराचे थैमान येई, अचानक होणाऱ्या गारपिटीमुळे कोट्यवधीचे नुकसान होई, अशा सर्व अस्मानी संकटावर चिनी वैज्ञानिकांनी तोफा आणि रॉकेटचा मारा करून नियंत्रणाची पद्धत शोधली आहे.

चीनमध्ये गेल्या पन्नास वर्षांत हवामान संशोधनासाठी पंचवार्षिक योजना राबविण्यात येतात. १९९० ते २००० या दहा वर्षांत चीनमध्ये सतरा लाख हेक्‍टर जमिनीवरील पिकांचे गारपिटीमुळे नुकसान झाले होते. तर एकट्या बीजिंग शहरात ३१ मे २००५ला झालेल्या गारपिटीमुळे ८७८७ मोटारींचे नुकसान झाले होते. चीनच्या वायव्य प्रांतात अत्यंत तीव्र दुष्काळ असे तर दुसरीकडे आग्नेय चीनमध्ये पुराचे थैमान असे. तर अनेक शहरातील जनजीवन अत्यंत गडद धुक्‍यामुळे विस्कळित होई, या सर्व अस्मानी संकटाचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर खूप परिणाम होत असे, म्हणूनच हवामानाच्या लहरीपणावर नियंत्रण मिळविणे चीनला अत्यंत गरजेचे झाले होते.

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी चीनमध्ये तोफा, रॉकेट लॉंचर आणि विमानाचा वापर करण्यात येतो. जमिनीवरूनच तोफा आणि रॉकेट लॉंचरच्या साह्याने ढगांचे रोपण (क्‍लाऊड सिडींग) केले जाते. याच पद्धतीने १९५२ जिल्ह्यांमध्ये तोफा आणि रॉकेट लॉंचरचा वापर करून पावसाचे प्रमाण वाढविले तर मोठी गारपीट रोखण्यात यश मिळविले. चीनमध्ये हवामानावरील अभ्यासासाठी २००५ या एका वर्षात ३७२१० शास्त्रज्ञ आणि कर्मचारी कार्यरत होते. त्याचबरोबर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ३७ मानवरहित विमाने, ७०७१ तोफा (३७ इंची) आणि ४६८७ रॉकेट लॉंचरचा वापर करण्यात आला. चीनमधील मोठ्या धरणात सतत पाणीसाठा राहावा, त्याचबरोबर दुष्काळी वायव्य चीनमध्ये पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी सुमारे दहा लाख विशिष्ट पद्धतीने तयार केलेले तोफगोळे, ८४, ४१६ रॉकेट, सुमारे सातशे किलो सिल्व्हर आयोडाईडचा वापर करण्यात आला. हवामानाच्या अभ्यासासाठी चीनमध्ये २६८ डॉप्लर रडार कार्यरत आहेत.

३७ इंची तोफा आणि रॉकेट लॉंचरचा वापर करून जमिनीवरूनच ढगांचे रोपण करण्याचे तंत्रज्ञान चीनच्या शास्त्रज्ञांनी शोधले आहे. तोफेतून सोडलेला गोळा आकाशात सहा किलोमीटरपर्यंत मारा करू शकतो आणि ढगांची उंची ही तीन ते सात किलोमीटर अशी असते. तर रॉकेट लॉंचर आकाशात आठ किलोमीटर पर्यंत मारा करतो. तोफगोळ्यामध्ये एक ते चार ग्रॅम सिल्व्हर आयोडाईड असते (रॉकेटमध्ये आठ ग्रॅम) ते जेव्हा गोळ्याचा ढगांत स्फोट होतो, तेव्हा तेथे टाकले जाते. तेथे रासायनिक क्रिया होऊन काही वेळातच पाऊस पडण्यास सुरवात होते. चीनच्या उत्तर आणि वायव्य प्रांतात अधिक शंभर टीएमसी पाणी मिळविण्याची योजना आखली होती. दीड लाख चौरस किलोमीटर परिसरातील यलो नदीच्या ९८ हजार चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्रात हा पाऊस पाडण्यात आला.

सुजलेगावनजीकच्या आमच्या नावंदी गावात गेल्या वर्षी एके दुपारी डॉ.मराठे तंत्राने कृत्रिम पावसाचा प्रयोग केला. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास तीन किलोमीटर परिसरात पाऊस सुरू झाला, तो दीड तास पडला. सोयाबीन, कपाशीच्या पिकांना २० दिवसांपासून पावसाचा ताण पडला होता, कृत्रिम पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले.
- उमाकांत देशपांडे- नावंदीकर, सरपंच

जमिनीवर भट्टी पेटवून ढगांपर्यंत क्षार पाठवण्याची पद्धत जगात अनेक ठिकाणी वापरली जाते. या पद्धतीतील पदार्थांचा अभ्यास होणे आवश्‍यक आहे. या पद्धतीबाबत आजही अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. "वरुण यंत्राची'ही उपयुक्तता तपासण्यासाठी तांत्रिक सहकार्य आवश्‍यक असल्यास आम्ही ते देऊ.

No comments:

Post a Comment